Wednesday, September 18, 2024

Epaper

spot_img

अदृश्य शक्तींमुळे विवेक कोल्हे विजयाच्या उंबरठयावर ! नगरमध्ये एकतर्फी, नाशिकसह इतर जिल्हयात निर्णायक आघाडी 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठीच्या प्रचाराची सांगता झाली असून या निवडणूकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी अखेरच्या टप्प्यात घेतलेली आघाडी निर्णायक ठरणार आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये अदृश्य शक्तींच्या पाठबळामुळे कोल्हे हे विजयाच्या उंबरठयावर आहेत. नगर जिल्हयात एकतर्फी तर नाशिकसह इतर जिल्हयातील आघाडीमुळे त्यांच्या विजयाची केवळ औपचारीकता बाकी राहिली आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहिर होण्यापूर्वीच उमेदवार विवेक कोल्हे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. आक्रमक भाषाशैली आणि दांडग्या जनसंपर्कामुळे विवेक हे शिक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचे विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर स्पष्टपणे जाणवले. तशा उत्स्फूर्त प्रतिक्रियाही शिक्षकांकडून देण्यात आल्या.

कोल्हे परिवाराचे नाव एकूणच नाशिक विभागासाठी नवे नाही. मा.मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचा राज्याच्या राजकारणातील दबदबा तसेच सहकार क्षेत्रात केलेले काम सर्वश्रुत आहे. विवेक यांचे वडील बिपीनदादा यांचे सहकार क्षेत्रातील काम तसेच मातोश्री स्नेहलता यांनी कोपरगांव मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना दिलेला न्याय याची चर्चाही या निवडणूकीच्या निमित्ताने झाली. समाजासाठी योगदान देणारे कुटूंब अशीच कोल्हे परिवाराची ओळख आहे.

  • विवेक कोल्हे यांच्याविषयी कौतुकाची भावना

काँग्रेेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविली. या निवडणूकीत घवघवीत यश संपादन करीत नगर जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, तत्कालीन खासदार डॉ.सुजय विखे यांच्याकडील कारखान्याची सत्ता हिरावून घेतली. पुढे राज्याच्या राजकारणातही थोरात यांच्यासोबत विवेक कोल्हे यांनी एकत्रीत काम केल्याने नगर जिल्हयातील सर्वच जेष्ठ नेत्यांच्या मनामध्ये विवेक यांच्याविषयी कौतुकाची भावना आहे.

  • सर्वपक्षीयांची साथ

नाशिक विभागातील सर्वच जिल्हयांमधील सर्वपक्षीय नेत्यांची कोल्हे यांना भक्कम साथ लाभली आहे. अपक्ष असतानाही विविध शिक्षक संघटनांनीही त्यांना साथ दिली आहे. नगर जिल्हयामध्ये तर कोल्हे हे एकतर्फी आघाडी घेणार असल्याचे चित्र असून इतर जिल्हयांमध्ये कोल्हे हेच आघाडीवर आहेत. शिवाय नगर जिल्हयातील त्यांचे नातेसंबंध, सहकाराचे भक्कम नेटवर्क, कोल्हे यांच्या यंत्रणेने जवळपास दोन महिने घेतलेली मेहनत यामुळे कोल्हे यांची हवा एकतर्फी असल्याचे शिक्षक मतदारांमध्ये चर्चा आहे.

  • पवार, आहेर, वाघ कुटूंब सक्रीय

नाशिकमध्ये विवेक कोल्हे यांच्या प्रचारामध्ये स्व. वसंतराव पवार यांचे कुटूंब, मा. खा. दौलतराव पवार यांचे कुटूंब तसेच शिक्षण क्षेत्रात दबदबा असलेला वाघ परिवार सक्रीय होता. तसेच मोठया शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, संघटना कोल्हे यांच्या प्रचारासाठी आघाडीवर होत्या. बाळासाहेब आहेर, आ. राहुल आहेर, समीर वाघ, अजिंक्य वाघ यांनीही कोल्हे यांच्या प्रचारासाठी योगदान दिले.

  • दोघा उमेदवारांविषयीची अनास्था कोल्हेंच्या पथ्यावर

या निवडणूकीतील उमेदवार आ. दराडे, गुळवे यांच्यापेक्षा अपक्ष विवेक कोल्हे यांची प्रतिमा उजवी आहे. दराडे यांचे पार्श्‍वभुमी, त्यांच्यावर दाखल असलेले फसवणूक आणि इतर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे तर संदीप गुळवे यांनी यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये केलेली हाराकिरी, त्यांच्यावरही दाखल असलेले गुन्हे, सतत राजकीय भूमिका आणि पक्ष बदलण्याच्या वृत्तीमुळे मतदारांमध्ये दोघांविषयी निर्माण झालेली अनास्था विवेक कोल्हे यांच्या पथ्यावर पडत गेली.

  • खानदेशातही कोल्हेच !

खानदेशामध्ये विविध शिक्षक संघटनांनी कोल्हे यांना पाठींबा दिला आहे. काही संघटनांनी छुपा पाठींबा देत कोल्हे यांनाच पसंती दर्शविली असून सर्वपक्षीय नेत्यांनी कोल्हे यांच्या पाठीशी आपआपल्या संस्थांचे पाठबळ उभे केले आहे.

  • वडील व चुलत्यांकडून जुळवाजुळव

सहकार क्षेत्रात दबदबा असलेेले विवेक कोल्हे यांचे वडील बिपीनदादा कोल्हे यांनी जळगांव जिल्हयात शेवटच्या दहा दिवसांत ठाण मांडून विवेक यांच्यासाठी राजकीय जुळवाजुळव केली. तर विवेक यांचे चुलते डॉ. मिलिंद कोल्हे यांनी धुळे आणि नंदुरबारमध्ये लक्ष घालून केलेला राजकीय स्ट्राईक चर्चेत आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी