Friday, November 28, 2025

Epaper

spot_img

अहिल्यानगर सिव्हिलमध्ये एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरूवात ; खा.लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश 

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला नव्या वर्षात सुरूवात होणार आहे. स्थानिक पातळीवर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेचे वैद्यकीय शिक्षणकेंद्र उभारण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना दीर्घकाळाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. खासदार नीलेश लंके यांनी त्यासाठी गेली दीड वर्ष पाठपुरावा केला होता.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटल सात वर्षांच्या करारावर हस्तांतरित करण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली. सध्या या रुग्णालयात दररोज सुमारे ४८० ते ५०० रुग्ण ओपीडीद्वारे उपचार घेतात, तर २८२ बेड क्षमतेच्या या रुग्णालयात परिसरातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यांतील रुग्णांनाही महत्त्वाची सेवा दिली जाते.

अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून खासदार नीलेश लंके सातत्याने पाठपुरावा करत होते. जिल्ह्याची तातडीची गरज ओळखून त्यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन अहिल्यानगरची वास्तवस्थिती सविस्तर मांडली. या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नड्डा यांनी लिखित स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन दिले होते.

खासदार लंके यांच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळेच राज्य सरकारकडून मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. महसूल विभागाकडून नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी सुरू असून, कायमस्वरूपी ठिकाण निश्‍चित होईपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलचा तात्पुरता वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अतिगंभीर रुग्णांसाठी उपचाराची स्थानिक सोय निर्माण होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांना नवा आयाम मिळवून देणारी ही प्रक्रिया खासदार नीलेश लंके यांच्या दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मोठे यश मानले जात आहे.

“अती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार”

हे महाविद्यालय सुरू झाल्याने आता अती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर अहिल्यानगर येथेच उपचार होणार आहेत. आजवर अशा रुग्णांना छत्रपती संभाजीनगर (घाटी) किंवा पुणे (ससून) येथे जावे लागत असे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी