मुंबई : प्रतिनिधी
महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी प्रश्न केला. त्यावर शिंदेंनी उत्तर देण्यापूर्वीच अजित पवारांनी शिंदेंचे माहिती नाही, पण मी मात्र निश्चितच शपथ घेणार आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरामुळे वार्तालापात एकच हस्यकल्लोळ उडाला.
देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
▪️शिंदेंचे माहिती नाही, पण मी मात्र शपथ घेणार
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशावर प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वतःही भूमिका स्पष्ट केली आहे. सायंकाळपर्यंत थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. शिंदे बोलत असताना अजित पवारांनी मध्येच हस्तक्षेप करत शिंदेंचे माहिती नाही, पण मी मात्र निश्चितपणे शपथ घेणार आहे, मी थांबणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरावर शिंदेंसह देवेंद्र फडणवीस व उपस्थित पत्रकार खळखळून हसले.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांना चपखल प्रत्युत्तर दिले. दादांना पहाटे व सायंकाळीही घेण्याचा (शपथ) अनुभव आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या उत्तरावरही पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ उडाला. शिंदे यांच्या उत्तरानंतर शांत बसतील ते अजित पवार कसले, ते पुढे म्हणाले, पूर्वी आम्ही दोघांनी (फडणवीस व पवार) सकाळी शपथ घेतली होती. तेव्हा हे राहून गेले होते. पण आता पुढे ५ वर्षे आम्ही हे पद ठेवणार आहोत. यावरही उपस्थित खळखळून हसले. या दोन्ही नेत्यांच्या या संवादाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.