पारनेर : प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सिध्देश्वरवाडी, कोहकडी तसेच शहाजापुर-सुपा येथील वन विभागाच्या हद्दीमध्ये वन उद्याने उभारण्यास वन विभागाच्या वतीने तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. एकूण १६ कोटी ४५ लाख ९९ हजार रूपयांच्या वन उद्यानांच्या कामांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील वन विभागाच्या हददीतील विविध प्रस्तावांना तत्वतः मान्यता देण्यात आली.
पारनेर तालुक्यातील कोहकडी, सिध्देश्वरवाडी, सुपा-शहाजापुर येथे वन उद्यान उभारण्यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळविण्यासाठी खा. लंके यांनी वेळेवेळी पाठपुरावा केला होता.
निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रस्तावांना तत्वतः मान्यता देण्यात आली. वन विभागाच्या अटींना अधीन राहून राज्य शासन किंवा जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करण्याच्या अटींवर ही मान्यता देण्यात आली आहे. वनक्षेत्रात वन उद्यानांची निर्मिती केल्यास त्याचा फायदा नागरीकांना होणार असल्याने खा. लंके यांनी या प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता.
सिध्देश्वरवाडी येथील सिध्देश्वर मंदिर परिसरात वन उद्यान उभारणीसाठी ३ कोटी ४० लाख ९० हजार, कोहकडी येथील रत्नेश्वर मंदिर फॉरेस्ट सर्व्हे क्र. ४९७ मध्ये वन उद्यानासाठी ३० कोटी ८ लाख ५५ हजार तर सुपा-शहाजापुर वन उद्यानासाठी ९ कोटी ९६ लाख ३१ लाख रूपयांच्या कामांना तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या सदस्य सचिव तथा व्यवस्थापकीय संचालकांनी खा. नीलेश लंके यांच्या कार्यालयास कळविले आहे.