पारनेर : प्रतिनिधी
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”
निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके, जितेश सरडे, संदीप गाडेकर, योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर, चंद्रभान ठुबे, दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे, प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन, प्रशांत बोरुडे, हिरामण चेडे, शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार, प्रवीण थोरात, प्रशांत साळवे, राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे, प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड, सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन, दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.


