पारनेर : प्रतिनिधी
दारूबंदी चळवळीचे प्रणेते आणि सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांच्या निघोज पंचायत समिती गणातील उमेदवारीस खासदार नीलेश लंके यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
गेल्या नऊ वर्षापासून खोट्या गुन्ह्यात अडकवून अहिल्यानगर व पुणे जिल्हयात प्रवेश बंदी करण्यात आलेली असताना, अपप्रवृत्तीने न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण करून त्यांना न्याय न मिळू देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खा. लंके यांनी करत कवाद यांनी नोटाचा प्रचार न करता या निवडणूकीत स्वतः उमेदवारी करावी, त्यांच्या उमेदवारीस सर्वपक्षीयांनी पाठींबा द्यावा असे आवाहन केले.
दारूबंदी चळवळीला नवे बळ देणारे बबन कवाद हे समाजहिताच्या कामात सदैव आघाडीवर राहिले. मात्र, त्यांच्या सामाजिक कार्याची खंत काही अपप्रवृत्तींना न पटल्याने खोटया गुन्ह्यांमध्ये त्यांना अडकवण्यात आले. न्यायालयात खटला प्रलंबित असून विरोधक मुद्दाम ‘तारीख पे तारीख’ घेत न्याय प्रक्रियेला विलंब लावत आहेत.
आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी बबन कवाद यांचा लढा अन्यायाविरूध्द आहे. त्यांनी नोटाच्या प्रचाराचा निर्णय घेतला असला तरी मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी स्वतः उमेदवारी करावी, कारण जनता तुमच्यासोबत आहे.
खासदार लंके यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बबन कवाद यांच्या उमेदवारीस बिनशर्त पाठिंबा देईल. तसेच इतर सर्व राजकीय पक्षांनीही या सामाजिक योध्दयाला पाठिंबा द्यावा. बबन कवाद यांनी निघोज पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी करावी, जेणेकरून जनतेच्या मतांमधून त्यांना खरा न्याय मिळेल आणि अपप्रवृत्तीला चपराक बसेल.


