Sunday, December 14, 2025

Epaper

spot_img

नगर जिल्ह्यातील ‘या’ निवडणूका लांबणीवर! उमेदवारांच्या उत्साहावर पाणी

मुंबई : प्रतिनिधी

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचारासाठी आज सुपर संडे आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. पण त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. याठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपिल असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपिल असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निवडणुकीदरम्यान 35 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले आहे. परंतु, अशा अपीलावर 23 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आदेश पारीत झाले असतील त्या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीबरोबरच अध्यक्षपदाच्या निवडणुका घेऊ नयेत, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अशा जागांसाठी आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होऊन 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर अशी होती.

या कालावधीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी 18 नोव्हेंबरला करण्यात आली. मात्र, अर्जांची छाननी करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला 35 जागांवरील उमेदवारांनी आक्षेप घेत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. परंतु, अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 23 नोव्हेंबर 2025 नंतर देण्यात आलेला आहे, अशा नगरपरिषदा-नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार घेण्यात येऊ नयेत.

अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार आता अशा ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. हा आदेश लागू झाल्यापासून संबंधित ठिकाणी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे, असेही आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी