वासुंदे : प्रतिनिधी
सत्ता नसतानाही तालुक्यात ठोस विकासकामे राबवून नेतृत्वाची छाप सोडणारे सुजित झावरे यांनी श्री बिरोबा यात्रा उत्सवानिमित्त वासुंदे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडलेल्या या शर्यतीचे उद्घाटन माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नव्याने बांधलेल्या बैलगाडा घाटाचे लोकार्पण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, “सुजित झावरे यांनी केवळ कार्यक्रम नव्हे तर विकासाच्या दिशेने भरीव पावले उचलली आहेत. बिरोबा मंदिरासाठी सभामंडप आणि इतर आवश्यक कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन मी देतो.” त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असे ठामपणे सांगितले.
संगमनेर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि नगर भागातील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शर्यतीला रंगत आणली. या उपक्रमामुळे गावात सणासारखा माहोल निर्माण झाला होता.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, बा.ठ.झावरे, भास्करराव उचाळे, अरुणराव ठाणगे, अमोल साळवे, शिवाजी रोकडे, सुधामती कवाद, ॲड. बाबासाहेब खिलारी, शंकर महांडूळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वासुंदे गावात सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे आणि सांस्कृतिक उपक्रमांची सांगड घालण्यात येत असून, यामुळे गावाला नवी दिशा मिळाली आहे. स्थानिकांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करत, अशाच पुढाकारामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.